जळगाव मिरर | २२ मार्च २०२४
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १०० कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ईडीची टीम 10वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री 9च्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. मात्र केजरीवालांच्या अटकेनंतर ‘आप’तर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. आप तसेच विरोधी पक्षांनीही केजरीवाल यांचच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. यामध्ये इंडिया आघाडीचाही समावेश आहे.
दरम्यान केजरीवाल यांच्याविरोधातील अटकेच्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनीही केंद्र सरकार आणि भाजपावर कडाडून हल्ला चढवला. शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केजरीवालांच्या अटकेचा निषेध नोंदवला. ‘मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानेच केजरीवालांवर कारवाई करण्यात आली ‘ असा आरोप शरद पवार यांनी केला. तसेच भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.
