
जळगाव मिरर | १ मार्च २०२६
फैजपूर तालुक्यातील हिंगोणा (ता. यावल) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून शनिवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीनसह सात जणांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाणे येथे खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींपैकी एक जण मुंबई पोलीस दल मध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असल्याने या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील परिसरात शनिवारी सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. प्रथमेश मुकेश महाले (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०), रीना रोहित गजरे (वय १९) व निखिल राजेंद्र गजरे (वय २६) यांच्यावर आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी व चाकूने हल्ला चढवला.
या हल्ल्यात प्रथमेश महाले याच्यावर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले. तसेच उर्वरित तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सावदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रथमेश महाले याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी यावल ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी शवविच्छेदन केले.
या प्रकरणी एका अल्पवयीनसह सुधीर रमेश तायडे, मनोज सुधीर तावडे (पोलीस शिपाई, मुंबई पोलीस दल), सचिन सुधीर तावडे, आरती सचिन तायडे, मंगलाबाई सुधीर तायडे (सर्व रा. हिंगोणा, ता. यावल) तसेच निखिल संजय तायडे (रा. मारूळ, ता. यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीना मोहित गजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे.
घटनेचा पुढील तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मयोनोधीन सैय्यद करीत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असून घटनेमागील नेमका वाद व हल्ल्याचे कारण याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे हिंगोणा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.




















