
जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२३
जळगाव शहरातील गिरणा नदी परिसरातील जलराम नगर येथील ४३ वर्षीय प्रौढ व्यक्ती बेपत्ता झालेल्या असतांना त्यांचा मृतदेह गिरणा नदीच्या पात्रात आढळून आल्याची घटना गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. संतोष रामधन पाटील (वय ४५, रा. जलाराम नगर, सावखेडा शिवार, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सावखेडा शिवारातील जलराम नगरात संतोष रामधन पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने मानसिकस्थीती बरोबर नव्हते. यातच बुधवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. याबाबत जळगाव तालुका पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद देखील करण्यात आली होती.
दरम्यान शोधकार्य सुरु असतांना गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गिरणा नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.




















