जळगाव मिरर । ३१ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्हा कारागृहामध्ये बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दोन बंदी गटांमध्ये जुन्या वैमनस्यातून मारहाण झाली. मारहाणीत तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) हा बंदी जखमी झाला आहे. बॅरेक क्रमांक दोनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बुधवारी दुपारी तेजस बॅरेक २ मध्ये झोपलेला असताना, याच कारागृहातील चार बंदींनी त्याला घेरले. आरोपींमध्ये पराग रवींद्र आरखे, बबलू उर्फ विशाल राजू गागले, भूषण विजय माळी उर्फ भाचा आणि सचिन कैलास चव्हाण यांचा समावेश होता. या चौघांनी तेजसला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेजसने कारण विचारले असता, आरोपींनी त्याला, ‘तू भूषण माळी उर्फ भाचा याचा विरोधक आहेस, तू त्याच्या नादी लागतो का?’ असे धमकावले. यानंतर या चौघांनी तेजसला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस टणक वस्तूने जोरदार वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
मारहाण करताना आरोपींनी तेजसला जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. हा सर्व प्रकार सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या कारागृह शिपायांनी तातडीने धाव घेतली आणि मध्यस्थी करून भांडण सोडवले. मारहाणीत जखमी झालेल्या तेजस सोनवणे याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर रात्री ९:३० वाजता जखमी तेजस सोनवणे याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आरोपी पराग आरखे, बबलू गागले, भूषण माळी उर्फ भाचा आणि सचिन चव्हाण या चार बंदीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
			

















