जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२४
राज्यातील आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी लागले असून आता नेत्यांसह कार्यकर्त्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज शुक्रवारी विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा तारखा जाहीर करणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून त्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी ३ वाजता हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचा तारखा जाहीर करेल, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीचे वेळापत्रकही आज निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून करण्यात येणाऱ्या घोषणेमध्ये उमेदवारी अर्ज भरणे, मतदान आणि निकालाची तारीख जाहीर करणे यासह निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांच्या तारखांचा तपशील असेल.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभांचा कार्यकाळ अनुक्रमे ३ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ जानेवारी २०२५ मध्ये संपणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या ३० सप्टेंबरपूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचीही निवडणूक आयोगाची योजना आहे.