भुसावळ : प्रतिनिधी
गुढीपाडव्याला शहरातील सतारे भागातील मरिमाता यात्रोत्सवातील बारागाड्यांना गालबोट लागले. सतारे चौकाच्या परिसरात बारागाड्या जात असताना बारागाड्यांचे नियंत्रण सुटल्याने बारागाड्या पाहण्यासाठी आलेल्या एका भाविकाच्या अंगावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बारागाड्या लोटणारे चार भाविक गंभीर झाले. दरम्यान कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला हा उत्सव यंदा सुरु झाला, यामुळे भाविकांची मोठी गर्दी होती. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या दुर्घटनेमुळे यात्रेच्या उत्सवावर विरजण पडले.
सातारे भागातील जगतजननी मरिमाता उत्सवात गुढीपाडव्याला बारागाड्या ओढल्या जातात. शनिवारी शहरातील जळगावरोडवरील गुरुव्दारापासून बारागाड्यांना सुरवात झाली. बारागाड्या सतारे चौकात पोचल्यानंतर अचानक नियंत्रण सुटले. याच भागात यात्रा पाहण्यासाठी आलेले भाविक गिरीष रमेश कोल्हे (वय ४२ रा. गवळीवाडा परिसर, जळगावरोड, भुसावळ) यांच्या पोट व डोक्यावरुन चाक गेल्याने ते जखमी झाला. त्याला पूढील उपचारार्थ रिदम हॉस्पीटलमध्ये हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. यात्रोत्सवातील बारागाड्या लोटत असलेले भाविक छोटू उत्तम इंगळे (वय ३३ रा. कोळीवाडा, भुसावळ), धर्मराज देवराम कोळी ( वय ६३, रा. जूना सतारे मरिमाता मंदिराजवळ, भुसावळ), मुकेश यशवंत पाटील (वय २८ रा. खळवाडी, भुसावळ), शिक्षक नितीन सदाशिव फेगडे (वय ५३ रा. गणेश कॉलनी, भुसावळ) हे भाविक गाडीखाली आल्याने जखमी झाले. या दुर्घटनेनंतर सतारे भागातील यात्रोत्सवात धावपळ उडाली.
सुदैवाने 4 भाविक बालबाल बचावले दरम्यान दुर्घटनेतील जखमींवर शहरातील साईपुष्प हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमींच्या पायावरुन गाड्यांचे चाके गेल्याने पाय फॅक्चर झाले आहेत. दरम्यान सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.
दोन वर्षांच्या कालखंडानंतर मरिमातेचा यात्रोत्सव झाला. यामुळे यात्रेत अधिक गर्दी होती. बारागाड्यांवर बसणाऱ्यांचेही प्रमाण अधिक होते. पहिल्याच गाडीवर अधिक प्रमाणात गर्दी होती. यामुळे गाडीचा भार (वजन) वाढले. सातारे चौकात गाड्यांचे वाढलेल्या वजनामुळे त्या अनियंत्रीत झाल्या. रस्त्याच्या डाव्या बाजूला गाड्या गेल्याने थेट भाविकांमधील गिरीष रमेश कोल्हे हे चिरडले गेले. तर गाड्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणारे चारही भाविक जखमी झाले, अशी या दुर्घटनेची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
समाजसेवक मदतीसाठी धावले
बारागाड्यांच्या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक मुकेश पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, सामाजिक कार्यकर्ते गिरीष महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवराज पाटील, शिवसेनेचे दीपक धांडे, भाजपचे अजय भोळे, सतीश सपकाळे आदींसह समाजसेवकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तत्काळ वेळेत वैद्यकिय मदत मिळाली. मात्र दुर्देवाने गिरीष कोल्हे रुग्णालयात पोचण्यापूर्वीच गतप्राण झाले.
बारागाड्या उत्सवास गालबोट
जळगावरोडवरील सतारे भागातील मरिमाता यात्रोत्सव सायंकाळी सहा वाजता सुरु होतो. बारागाड्या ओढल्यानंतर भाविकांची रात्री उशिरापर्यंत जगतजननी मरिमाता मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. तर रात्री यात्रेत उशिरापर्यंत भाविकांची खरेदी सुरु असते. मात्र या दुर्घटनेनंतर यात्रोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले. दुर्घटनेनंतर भाविकांनी यात्रेत खरेदीसाठी जाण्याऐवजी घराकडे प्रयाण केले.
पोलिसांचा तोकडा बंदोबस्त : यात्रोत्सवात बारागाड्या : जळगाव रोडवरुन ओढल्या जातात, रस्त्याच्या डिव्हाईडच्या एकाच बाजूने अधिक गर्दी होते. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त गरजेचा असतो. शहर पोलिसांचा बंदोबस्त मात्र तोकडा होता. गर्दी बाजूला सारण्यासाठी देखील पोलिसांची मदत झाली नाही. भाविक बाजूला असते, गर्दीवर नियंत्रण असते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी चर्चाही या दुर्घटनेनंतर होती.
पाच वर्षानंतरची दुर्घटना
मरिमाता यात्रोत्सवात सन २०१८ मध्ये शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रमेश सौंदाणे – कुंभार या पोलिस कर्मचाऱ्याचा गाड्यांखाली आल्याने जागीच मृत्यू झाला होता. जळगावरोडवरील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बंदोबस्तावर असताना या पोलिस कर्मचाऱ्याचा बळी गेला होता. या घटनेनंतर पाच वर्षांनी ही दुसरी दुर्घटना घडली आहे. बारागाड्यांवर बसणाऱ्या तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने हे प्रकार घडत असल्याचेही जाणकारांनी सांगितले.
आकाश पाटीलचे धैर्य व समयसुचकता
मरिमाता यात्रोत्सवात बारागाड्यांच्या पहिल्या गाडीच्या दुस्सरवर , पहेलवान आकाश संजय पाटील रा. जुना सतारे हा तरुण होता. सतारे चौकात गाड्यांचा वेग वाढल्याने त्याने एकट्याने शर्तीने प्रयत्न केले. गाड्या नियंत्रणात आणण्यासाठी त्याचे मोठे योगदान राहिले, अन्यथा रस्ता दुभाजक ओलांडून गाड्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याजवळील भाविकांच्या अंगावर गेल्या असत्या. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भिती होती. मात्र आकाशच्या समयसुचकेमुळे हा प्रकार टळला. या दुर्घटनेत आकाश देखील किरकोळ जखमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.