जळगाव मिरर / २१ एप्रिल २०२३ ।
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथे जाहीर सभा झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिंदे गटातील एका आमदारासह त्यांच्या बहिणीतच आता राजकारण रंगणार असल्याची चर्चा जनतेतून होत आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे २३ रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहे. यावेळी ते सभा घेत असल्याने जळगाव जिल्ह्यातील देखील राजकारण तापणार आहे.
जिल्हा दौऱ्यावर 23 एप्रिलला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जळगाव असणार आहेत. त्याचबरोबर ठाकरे यांची सभा देखील पाचोरा येथे होत असल्याने उद्धव ठाकरे सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह आता वाढला आहे. माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचे आयेजन केले आहे. शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील सेनेचे सर्वच्या सर्व पाच आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले होते. या घटनेनंतर जळगाव जिल्हयात ठाकरे गटात मोठे खिंडार पडल्याच पाहायला मिळाले होते. यानंतर उर्वरित कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना उत्साह देण्याच्या निमित्ताने आणि माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरेंच्या यापुर्वीही छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथे जाहीर सभा झाल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याआधी झालेल्या सभांमधून राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
विशेष उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून महत्वाचा शिवसैनिक असलेल्या गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेसोबत जात जोरदार धक्का दिला होता. तर दुसरीकडे कारण जळगाव जिल्ह्यातील सेनेचे पाच आमदार शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यात पाचोऱ्याचे आ किशोर पाटील यांचाही त्यात समावेश आहे. आ किशोर अप्पा पाटील हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे गटाची धुरा आपल्या खांद्यावर घेत आपल्या भावाला राजकीय दृष्ट्या आव्हान निर्माण केल्याचं पाहायला मिळत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या या सभेला राजकीयदृष्ट्या एक वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे यांची सभा पाचोरा येथील अटल मैदानावर होत आहे.