
जळगाव मिरर । १७ मार्च २०२६
मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानक येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली असून, कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी राजुकुमार गुप्ता याला सूरत येथून अटक करण्यात आली आहे. मृत महिला पुष्पा (वय ३६) हिचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या घटनेच्या काही तासांपूर्वीच तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा आणि तिचा पती राजुकुमार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. या त्रासाला कंटाळून पुष्पाचा भाऊ कमलेश कुमार गुप्ता, जो भारतीय सैन्यात जवान आहे, तो बहिणीला व तिच्या १५ वर्षीय मुलाला मूळ गावी उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यासाठी मुंबईत आला होता. १४ मार्च रोजी सकाळी पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या राजुकुमारने पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. पुष्पा, तिचा भाऊ आणि मुलगा मुलुंड रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी निघाले असताना, कमलेश यांना आपले लष्करी ओळखपत्र घरी विसरल्याचे लक्षात आले. ते आणि पुतण्या घरी परतल्यानंतर आरोपीने चतुराईने दोघांना घरात कोंडून ठेवले. यानंतर राजुकुमार थेट स्थानकावर पोहोचला, जिथे पुष्पा एकटीच उभी होती.
स्थानकावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. याचदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकल येत असताना राजुकुमारने मागून जोराचा धक्का देत पुष्पाला रुळावर ढकलले. या भीषण प्रकारात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने आपल्या मुलाला सोबत घेत मुंबईतून पलायन केले. दरम्यान, घरात अडकलेल्या कमलेश यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने सुटका करून घेतली आणि स्थानकावर धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते.
ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुर्ला लोहमार्ग पोलीस यांनी तातडीने तपास सुरू करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासात आरोपी सूरत येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















