जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२५
राज्यातील अनेक शहरासह ग्रामीण भागात अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता यवतमाळ जिल्ह्यातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात विद्यार्थी घेऊन जाणारा भरधाव रिक्षा उलटला. या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला. ही दुदैवी घटना मंगळवारी दि.११ सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पुसद शहरातील साई मंदिर परिसरात घडली. या घटनेने पालकांत संतापाची लाट पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सौरव भिका राठोड ( वय १३) रा. दहिवड ब्रु. ता. पुसद असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पुसद येथील आसेगावकर शाळेत सातव्या वर्गात शिक्षण घेत होता. दहिवड येथे स्कूलबस जात नसल्याने त्या गावातील विद्यार्थी रिक्षाने पुसद येथे शाळेत येतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी सौरव व अन्य विद्यार्थी ऑटोने शाळेत जात होते. अशातच पुसद येथील साईमंदिर परिसरात एम. एच. २९ व्हि. ८९७६ क्रमांकाचा ऑटोचा अपघात झाला. यात सौरव राठोड हा विद्यार्थी ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.