जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२३
पत्नीनेच मेहुणी आणि मेव्हण्याच्या मदतीने भोंदूबाबाची जडीबुटी खाण्यास भाग पाडून वेडे ठरवत हत्येचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर, संयुक्त बँक खात्यातील लॉकरमधील दोन किलो सोने आणि घरातील १५ लाखांच्या रोकडवर डल्ला मारल्याचा आरोप करत पतीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहे.
तक्रारीनुसार, दादर परिसरात तक्रारदार ५६ वर्षीय व्यावसायिक राहण्यास आहेत. २०१८ ते २०२० पर्यंत वडाळा येथील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. पत्नीने धमकावत जेवणातून ढोंगीबाबाने दिलेली जडीबुटी टाकून वेडे होण्याची परिस्थिती निर्माण केली. याच औषधांद्वारे हत्येचा प्रयत्न झाला. ही बाब लक्षात येताच त्यांनी जाब विचारला तेव्हा, पत्नीसह मेहुणी आणि मेव्हण्यानेही जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे, पत्नीने संयुक्त बँक खात्यातील २ किलो सोने काढून घेतले. तसेच, घरातील १५ लाखांची रोकडही हळूहळू चोरी करून मेहुणीला दिल्याचा आरोप करत त्यांनी भोईवाडा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा नोंदवत अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी शनिवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
