जळगाव मिरर | १ मार्च २०२४
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या कृषी, वनीकरण आणि इतर जमीन वापर प्रकल्प सुरू करण्याची योजना आखत आहे. हा प्रकल्प शेतीचे उत्पन्न वाढवतांना हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास, मातीतील सेंद्रिय कार्बन सुधारण्यास आणि शेतीच्या पातळीवर कार्बन साठवणूक करण्यासाठी सक्षम करण्यास मदत करेल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत माहितीसाठी जैन हिल्सच्या बडी हांडा हॉल येथे दि. २३ मार्च २०२४ ला सकाळी १० ते १ वाजेदरम्यान बैठकीचे नियोजन केले आहे.
यामध्ये सर्व इच्छुक सहकारी, स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि भागधारकांनी उपस्थित राहून योगदान द्यावे अशी विनंती कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ०२५७-२२५८०११ (२४९) वर संपर्क साधू शकतात.
शेतकरी क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करतात त्यांना कार्बन क्रेडिट मिळविण्यासाठी सक्षम करणे हा प्रकल्पामागील जैन इरिगेशनचा उद्देश आहे. कृषी पद्धतींमध्ये क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्याविषयी जागृती व अमलबजावणी करेल. यातून शेतीसाठी शाश्वत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देता येईल.
या प्रकल्पांतर्गत क्लायमेट स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि पद्धतींचा समावेश केला जाईल, जसे की ठिबक सिंचन, फर्टिगेशन, सौर पंप, पुनरुत्पादक शेती पद्धती, चांगल्या कृषी पद्धती सोबतच कृषी वनीकरणही करता येईल. यातून नापिक जमिनीसुद्धा सुपिक करण्यावर भर असेल. जैन इरिगेशन हा प्रकल्प आंतरराष्ट्रीक मानांकनाच्या शिफारशींप्रमाणे (कार्बन मार्केट स्टँडर्ड) अंतर्गत विकसित साकारला जाणार आहे.