जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२५
आई-वडील कामाला गेलेले असताना घरी एकटाच असलेल्या ज्ञानेश्वर कडू साळुंखे (वय २८, रामेश्वर कॉलनी) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी रामेश्वर कॉलनीत कॉलनीत घडली. आत्महत्येपूर्वी ज्ञानेश्वरने आपल्या मित्राला कॉल करून तो कोठे आहे, अशी विचारणा केली आणि त्यानंतर आपली जीवनयात्रा संपविली
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका रुग्णालयात कामाला असलेला ज्ञानेश्वर साळुंखे हा रामेश्वर कॉलनीमध्ये आई-वडीलांसह राहत होता. आई आशासेविका असून वडील हमाली काम करतात. नेहमीप्रमाणे ते दाम्पत्य बुधवारी कामाला निघून गेल्याने ज्ञानेश्वर हा घरी एकटाच होता. यावेळी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याने मित्र शुभम रंगारी याला कॉल करून तू कुठे आहेस अशी विचारणा केली होती. नंतर शुभम हा त्याच्या घरी गेला त्या वेळी ज्ञानेश्वर हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
मित्र गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच शुभमला धक्का बसला. त्याने घराबाहेर येवून शेजारच्यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.