जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
राज्यात नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक परिवारांनी धार्मिक दर्शनाचा प्लान बनविला असतांना नुकतेच अक्कलकोट दर्शन घेऊन गाणगापूरकडे निघालेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्कार्पिओ गाडीने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती संभाजी नगर येथील कुटे व जालना येथील चौरे कुटुंबीय हे अक्कलकोट येथून देवदर्शन करून परत येत होते. ते आपल्या कारने (एमएच २० सीएस ६०४१) घरी परत येत होते. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला.
या अपघातातील मृतांची नावे अनिता परशुराम कुटे (वय ४८, रा. छ. संभाजीनगर) , भागवत यशवंत चौरे (वय ४७), सृष्टी भागवत चौरे (वय १३), वेदांत भागवत चौरे (वय ११, सर्व रा.अंबड रोड जालना) येथील रहिवाशी आहेत. गाडीचा चालक जखमी झाला आहे. परशुराम लक्ष्मण कुटे ५५ हे स्वतः गाडी चालवत होते. ते छ.संभाजीनगर येथील रहिवाशी आहेत. तर छाया भागवत चौरे (वय ४०, रा. अंबड रोड, जालना) या जखमी झाल्या आहेत. अक्कलकोटवरून गणपूरला जात असलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन चार भाविकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मृत सर्व एकाच कुटुंबातील असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.