जळगाव मिरर / १८ नोव्हेंबर २०२२
तुम्हाला जर सोशल मीडियावरील विविध प्लँटफॉर्मवर अनोळखी व्यक्ती किंवा देशाबाहेर कुणी रिक्वेस्ट पाठवत असाल तर सावधान असे कृत्य तुमच्यासोबतही होऊ शकते. एक महिला जी उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीतुन निवृत्त होऊन काही पैश्याच्या हव्यासापोटी तिची तब्बल कोटी रुपयात फसवणूक झाली आहे.
अलिबागमधील एका सरकारी नोकरीतून निवृत्त महिला मोहजालात अडकली. यामुळेच त्यांना आयुष्यभर मेहनतीने कमावलेल्या 1 कोटी 12 लाख रूपयांवर पाणी सोडावं लागलं. ऑनलाईन फ्रॉड झालेल्या महिला या कोर्ट सुपरिटेडेंट या पदावरुन निवृत्त झाल्या. ही महिला अलिबाग इथेच राहतात. एक दिवस त्यांना फेसबूकवर इंग्लंडमधून फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली आणि तिथेच त्यांचे ग्रह फिरायला सुरूवात झाली. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर या दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. समोरच्या व्यक्तीने या महिलेचा विश्वास जिंकला. महिला आपल्या जाळयात फसल्याचं लक्षात येताच या व्यक्तीने रंग दाखवायला सुरुवात केली.
इंग्लंडमधून सरप्राईज गिफ्ट पाठवल्याचं महिलेला सांगण्यातं आलं. हे गिफ्ट दिल्लीतील कस्टम ऑफिसमध्ये अडकलंय. या गिफ्टमध्ये सोनं आणि विदेशी चलन आहे. या गिफ्टमधील सोन्याची आणि रक्कमेची किंमत भारतातील 99 लाख रुपये असल्याचं पटवून देण्यास फेसबूकवरील मित्र यशस्वी ठरला. त्यांनतर या प्रकरणात आरोपीसह 6 जण जोडले गेले. गिफ्टमध्ये असलेली करन्सीची रक्कम फिर्यादीच्या खात्यात जमा करण्यासाठी या महिलेला एकुण किती रक्कम भरायची आहे, याबाबत सांगण्यात आलं. विशेष म्हणजे या महिलेला इतकी मोठी रक्कम सांगितल्यानंतरही संशय आला नाही. महिलेने मागचा पुढचा कसलाच विचार न करता सोनं तारण ठेवलं. पैशांची जमवाजमव केली. त्यानंतर या महिलेने 1 कोटी 12 लाख आणि 800 रुपये इतकी रक्कम त्या फेसबूक फ्रेंडच्या खात्यात ट्रान्सफर केली. रक्कम ट्रान्सफर केल्यानंतरही या महिलेला आपला गेम झाल्याचं लक्षात आलं नाही. मागितलेली सर्व रक्कम पाठवली. मात्र सांगितल्याप्रमाणे कोणतही गिफ्ट मिळालं नाही. त्यामुळे महिलेला संशय आला. त्यानंतर फेसबूकवरुन तो फ्रेंडही गायब झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर महिलेने अलिबाग पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत.