जळगाव मिरर | १७ जुलै २०२५
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करताना चाळीसगाव शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नागदच्या व्यापाऱ्याचा सुमारे ७ लाख १९ हजार २९ रूपयाचा गुटखा पकडला आहे. वाहनासह १५ लाख १९ हजार २९ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहनाच्या दोन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यासह नागदच्या व्यापाऱ्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहरातून प्रतिबंधित गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप घुले, पो.कॉ. आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे व गुन्हे शोध पथकाने बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हिरापूर रोडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ वाहनांच्या तपासणी सुरु केली. या वेळी महिंद्रा पिकअप (एमएच ४१, एयू ३२१०) हे वाहन अडवले. या वाहनात ताडपत्रीने झाकून ठेवलेला सुगंधीत पानमसाला, सुगंधीत तंबाखू असा साठा मिळाला. तर चालकाकडे वाहनाबाबत कागदपत्रे आढळली नाहीत.
पोलिसांनी वाहनासह गुटखा ताब्यात घेत या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनास दिली. अन्न सुरक्षा अधिकारी चाळीसगावात आल्यावर त्यांनी जप्त गुटख्याची माहिती घेतली. तपासात सुमारे ७ लाख १९ हजार २९ रूपयांचा गुटखा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा गुटखा तसेच ८ लाखाचे वाहन असा सुमारे १५ लाख १९ हजार २९ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा गुटखा कन्नड तालुक्यातील नागद येथील दीपक प्रवीणचंद बेदमुथा याचा आहे. त्याच्या सांगण्यानुसार गुटख्याची वाहतूक करत असल्याचे चालकाने चौकशीत सांगितले. या प्रकरणी वाहन चालक सलीम मुनीर खान (वय २४, रा. ग्रीन पार्क, पाचोरा), अरबाज इब्राहीम पठाण (वय २२, रा. सार्वे, ता. पाचोरा) व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा (रा. नागद, ता. कन्नड) या तिघांविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने चाळीसगावसह नागद परिसरात खळबळ उडाली आहे.
