जळगाव मिरर | २१ जून २०२४
राज्याच्या राजकारणात नेहमीच सत्तेत असून देखील आपली वेगळी भूमिका सातत्याने मांडणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू हे नेहमीच विविध वक्तव्याने चर्चेत येत असतांना आज देखील पुन्हा त्यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
आ.बच्चू कडू म्हणाले कि, भाजपनेच एकनाथ शिंदे यांचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून भाजपने असे करने योग्य नाही असे तसेच अमरावतीत सर्व नवनीत राणा यांच्या विरोधात होते. त्यानंतरही शिवसेनेच्या या जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली असा दावाही त्यांनी केला आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले कि, ”भाजप काहीही करू शकते. उद्या ते एकनाथ शिंदे यांना पण म्हणतील या मतदार संघात उभे राहू नका, त्याऐवजी या मतदारसंघात उभे रहा. त्यांच्याकडे सत्ता आहे तर ते काहीही करतील. हिंगोली लोकसभेत हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी नाकारण्यात आली. उमेदवार शिवसेना शिंदेंचे आणि त्यांना उमेदवारी द्यावी की नाही? हे भाजपाकडून ठरविले जात असेल तर हा अफलातून कारभार आहे”, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.
पुढे बच्चू कडू म्हणाले, ”अजित पवार यांचेही उमेदवार भाजपने ठरवले होते. दोन उमेदवार पडणार असल्याचे सांगून ते बदलण्यास सांगितले गेले. याउलट जिथे भाजपाचेच पदाधिकारी उमेदवार बदला सांगत होते, तिथे मात्र सोयीस्कर पद्धतीने दुर्लक्ष केले गेले. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका, असे जिल्ह्यातील भाजपा नेते सांगत होते. तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली. हा एकप्रकारे गेमच होता. अमरावतीमध्ये सर्व्हे नकारात्मक असतानाही उमेदवार बदलला नाही आणि शिवसेना शिंदे गटाचे चार उमेदवार तुम्ही बदलण्यास भाग पाडले”, असे भाष्य बच्चू कडू यांनी केले आहे.
