जळगाव मिरर । २७ जून २०२३
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती जळगाव शहरातील जिल्हा पोलीस मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज दि.२७ रोजी झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा देखील केली आहे.
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस, केळी उत्पादनाने जिल्हा प्रसिद्ध असून केळी उत्पादकांसाठी राज्य शासनाने केळी विकास महामंडळाची स्थापना केली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन आणि जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांनी केलेल्या मागणीनुसार केळी विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथे केली. दरम्यान, खान्देशची प्रेरणा घेऊनच मी देखील केळीची लागवड केली असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्याला देण्यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगावात पार पडला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेश पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार शिरीष चौधरी, चंदूलाल पटेल, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे सीईओ पंकज आशिया यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक योजना बंद करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर अवघ्या 11 महिन्यात सर्वसामान्य जनतेच्या या सरकारने लोकहिताचे निर्णय घेतले असून निर्णय घेण्यासाठीही धाडस लागते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, हे सरकार कष्टकर्यांचे आहे, कामगारांचे आहे, वारकर्यांचे आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच राज्य सरकार गतीमान निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केळी उत्पादकांसाठी मोठी घोेषणा केली. यात केळी विकास महामंडळासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून केळी महामंडळ स्थापनेसाठी पाठपुरावा केला आहे. गेल्या वर्षी 20 सप्टेंबर रोजी पाळधी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता पालकमंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्र्यांना साकडे घातले होते. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केल्याने लवकरच केळी विकास महामंडळ अस्तित्वात येणार आहे. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार हे तीन जिल्हे मिळून जळगावला विभागीय आयुक्त कार्यालयाचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. जळगावला बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
