जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२५
जळगाव जिल्ह्यातील चोपडा जवळ असलेल्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या पार उमर्टी येथे कारवाईसाठी गेलेल्या चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकावर हल्ला झाला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालत बेदम मारहाण केली. ही घटना दि. १५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांना पुलावरुन खाली फेकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डींसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोना शशिकांत पारधी, किरण पारधी, चेतन महाजन, दीपक शिंदे, विशाल पाटील हे मध्य प्रदेशातील पारउमर्टी ता. वरला जि. बडवाणी येथे दि. १५ रोजी कारवाईसाठी गेले होते. एका संशयिताला ताब्यात घेवून येत असतांना महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या पुलावर चोपडा ग्रामीण पोलिस व पार उमर्टी येथील ग्रामस्थांमध्ये वाद होवून शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला करीत त्यांना बेदम मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे व किरण पारधी यांना जखमी पोलीसांना रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सायंकाळी ग्रामस्थांनी हल्ला केल्यानंतर काही जणांनी पोलिसांवर गोळीबार करुन त्यांच्यातील शशिकांत पारधी या पोलीस कर्मचाऱ्याला डांबून ठेवले होते. पोलिसांची कुवक घटनास्थळी पोहचल्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरा त्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह चोपडा ग्रामीण, चोपडा शहर यांच्यासह आरसीपी प्लाटून व धरणगाव व एरंडोल येथून अतिरीक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.