जळगाव मिरर | १० नोव्हेंबर २०२५
जळगाव शहरातील प्रमुख आकाशवाणी सर्कल, इच्छा देवी चौक आणि अजिंठा चौफुली परिसरात प्रचंड गवत, झुडपे व जंगली झाडे उगवून परिसर विद्रूप बनला होता. नागरिकांना दररोज अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असताना प्रशासन मात्र मौन होते. अखेर मनसेनेच या निष्क्रियतेला झटका दिला. मनसे जळगाव शहर तर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांना निवेदन देऊन संबंधित सर्कल परिसराची तातडीने साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
या निवेदनात मनसेने स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता “आकाशवाणी चौक हा शहराचा चेहरा आहे. जर तीन दिवसांत परिसर स्वच्छ केला नाही, तर मनसे सर्कलमध्ये प्रतीकात्मक निषेध म्हणून बकऱ्या चारेल.. हा इशारा जाहीर होताच शहरभर चर्चा रंगली आणि प्रशासनाच्या टेबलावर हलकल्लोळ माजला. नागरिकांनीही मनसेच्या भूमिकेचे स्वागत करत “अशा कठोर इशाऱ्यानेच अधिकारी जागे होतात” असे मत व्यक्त केले. आणि शेवटी, मनसेचा इशारा कामी आला. आज सकाळी संबंधित प्रशासनाने तातडीने आकाशवाणी चौक परिसरातील स्वच्छतेचे काम सुरू केले. काही तासांतच सर्कल परिसरातील गवत, झुडपे काढून परिसर स्वच्छ व आकर्षक बनवण्यात आला.
आकाशवाणी सर्कल सफाई अभियान सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, दीपक राठोड उपस्थित होते.



















