जळगाव मिरर | २० मे २०२५
जळगाव शहरात बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात असून राज्य सरकारच्या अनेक योजना कामगारांसाठी असतात आता भांडी योजना मोठ्या प्रमाणात सुरु असतांना यात लाभार्थीकडून भांडी देण्यासाठी ८00 ते १ हजार रुपयांची मागणी होवून त्यांची आर्थिक लुट हि शहरातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे शहरात या भांडी वाटप करण्यासाठी कुठलेही केंद्र नेमण्यात आलेले नाही तर ठेकेदाराचे काही कामगार लाभार्थींना फोन करून पैश्याची मागणी करीत त्यांना घरपोच भांड्याचा सेट देण्यात आल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळद्वारे बांधकाम कामगार भांडी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना घरेलू भांडी सेट मोफत दिला जात असतो. यात 30 वस्तूंचा हा सेट असून कामगारांना स्वतःचे स्वयंपाक घर बनवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो मात्र या योजनेच्या नावाखाली शहरातील काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने या योजनेतील भांडीचा सेट लाभार्थ्यांना ८०० ते १ हजार रुपयावर पैसे घेवून दिले जात आहे. यामुळे सर्व सामान्य लाभार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत सहाय्यक आयुक्त यांना विचारणा केली असता. त्यांना या साऱ्या घटनेचा पुरावा हवा आहे तेव्हाच ते यावर कारवाई करणार असल्याचे समजते.
राजकीय नेत्यांसह ठेकेदाराची चांदी तर लाभार्थीना आर्थिक फटका !
बांधकाम कामगार योजना गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे मात्र यापूर्वी शहरापासून नजीक असलेल्या एका ठिकाणी भांडीचा सेट मोफत वाटप करण्यात येत होता. आता मात्र शहरात कुठल्याही ठिकाणी हे केंद्र दिसून आलेले नाही. या योजनेमध्ये काही राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी हा टेंडर मिळविला असून राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने व टेंडरमालकाच्या संगनमताने गोरगरीब बांधकाम कामगाराकडून ८०० ते १ हजार रुपयांची आर्थिक लुट जळगाव शहरातील अनेक गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
