जळगाव मिरर । २४ डिसेंबर २०२२
कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे चीनमधून २०१९ मध्ये कोरोना भारतामध्ये आला होता. तेव्हापासून भारतात कोरोनाचे रुग्ण वाढले होते. आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने थैमान माजविले आहे. त्याच अनुषंगाने देशातील आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे. कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. ब्लूमबर्गने चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या हवाल्याने म्हटले आहे की, मंगळवारी येथे एकाच दिवसात 3 कोटी रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. मात्र, अधिकृत आकडेवारीत या दिवशी केवळ तीन हजार रुग्णसंख्या सांगण्यात आली आहे. अहवालानुसार, या महिन्याच्या पहिल्या 20 दिवसांत 24 कोटी 80 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये एका दिवसात 40 लाख कोरोना रुग्ण आढळले होते.
चीन आणि चिनी कम्युनिस्ट पक्षावर नजर ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. रस्त्यांवर दोरी बांधून लोकांना सलाइन दिले जात असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व प्रकार रुग्णालयांमध्ये खाटांच्या कमतरतेमुळे होत आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारीही असाच एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये चीनमधील एका वर्गात शिकत असताना मुले सलाइन घेत असल्याचे दिसून आले. चीननंतर जपानमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 73 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. तेथे 315 लोकांचा मृत्यू झाला आहे. जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, येथे 8वी लाट आली आहे. ओमायक्रॉन प्रकारामुळे मुले मरत आहेत. 8 महिन्यांत 41 बालकांना जीव गमवावा लागला आहे. चीनमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे जपानची चिंता वाढली आहे.
