
जळगाव मिरर | १ एप्रिल २०२५
अनेक लोकांनी आजपर्यत पोपटाला काही प्रमाणात माणसासारखे बोलताना पाहिले असेल. मात्र पालघर जिल्ह्यात एक कावळा आढळून आला आहे जो माणसाप्रमाणे बोलतो. पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेले गारगाव या गावात हा कावळा आढळून आला आहे. या बोलणाऱ्या कावळ्याने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील गारगाव या गावातील एका आदिवासी कुटुंबाने या कावळ्याचे संगोपन करत त्याला घरी पाळले आहे. हा कावळा अगदी माणसासारखा बोलायला शिकला आहे. लहान असतानापासून हा कावळा याच कुटुंबात वाढला असल्याने तो चक्क माणसासारखे बोलायला शिकला आहे. मंगळ्या मुखणे असे कुटुंबीयांचे नाव असून त्यांनीच या कावळ्याचे संगोपन केले आहे. तीन वर्षांपूर्वी मुलांनी कावळ्याचे पिल्लू आणले होते. हे कावळ्याचे पिल्लू मंगळ्या मुखणे यांच्याच घरात लहानाचा मोठा झाला आहे.
हा कावळा पापा, काका, ताई, आई, बाबा असे अनेक शब्द उच्चारतो. अगदी माणसासारखेच स्पष्ट उच्चार हा कावळा करताना दिसतो. तसेच कुटुंबातील व्यक्ती बोलत असताना त्याला प्रतिसादही हा कावळा देतो. या कावळ्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तसेच या कावळ्यामुळे पालघर जिल्ह्यात असलेले अतिदुर्गम भागातील गारगाव हे गाव देखील चर्चेत आले आहे.





















