जळगाव मिरर / २८ एप्रिल २०२३ ।
राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला असून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारी 12 वाजताच अंधार पडल्याची घटना घडली आहे. विजांचा कडकडाट, अंधारुन आलेले वातावरणामुळे संध्याकाळचे 7 तर वाजले नाहीना, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. विविध घटनांत आठ जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारी 12 वाजताच अंधारुन आले होते. वातावरणाचा बदललेला नूर पाहुन सर्वांनीच पाऊस पाहण्यासाठी गर्दी केली होती. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस धो-धो कोसळत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. खान्देशात काल गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. आजही हवामान विभागाने राज्यातील विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यासह मराठवाड्यावर भर उन्हाळ्यात अवकाळीचे काळे ढग पुन्हा घोंगावत आहेत. आजपासून 30 एप्रिलपर्यंत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात अधूनमधून वादळी पाऊस, गारपिटीची मालिका सुरू आहे. आज (दि.28) राज्यात मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर यलो अलर्ट मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ पुणे या भागात देण्यात आला आहे. गुरुवारी खान्देशातील जामनेर, पाळधयाठिकाणी गारपिटीचा पाऊस झाला.
