जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२६
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर अन्य पक्षांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. शपथविधीबाबत बोलणे हे इतर पक्षांचे स्वातंत्र्य असले तरी, काही दु:खद घटनांमुळे पक्षाचे कार्यकर्ते सैरभैर झाले होते आणि त्या परिस्थितीत नेतृत्वाची गरज निर्माण झाली होती, असे त्यांनी सांगितले.
अनिल पाटील म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान अजित पवार यांनी दिलेल्या उमेदवारीसाठी बारामतीत प्रचार सुरू असताना कार्यकर्ते दिशाहीन झाले होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पक्षाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार केले आणि त्यानंतरच निर्णयाची माहिती त्यांना देण्यात आली.
शासकीय दुखवटा पूर्ण झाल्यानंतर नेता निवडणे ही वेळेची गरज होती, असे स्पष्ट करत अनिल पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कुणाला कोणते खाते द्यायचे, हा निर्णय मुख्यमंत्री घेतात आणि तो युतीतील सर्व पक्षांना मान्य करावा लागतो. अर्थ खात्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड ही प्रक्रिया आमदारांमार्फतच पार पडणार असून, ती आज दुपारी पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाईल, असेही अनिल पाटील यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अनिल पाटील म्हणाले की, ते वक्तव्य खरे असण्याची शक्यता आहे; मात्र सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत त्यांना माहिती होती की नाही, हे स्पष्ट नाही. नेता निवडीची प्रक्रिया ही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची अंतर्गत बाब असून, दुसऱ्या पक्षांचे आमदार या प्रक्रियेत सहभागी होत नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे अनिल पाटील यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचा याबाबतचा विचार पक्षाच्या मंचावर मांडलेला नसला, तरी त्यांच्या कृतीतून आणि बॉडी लँग्वेजमधून तसे संकेत मिळाले होते. स्थानिक निवडणुकांच्या काळात त्यांनी तशा सूचनाही दिल्या होत्या. कार्यकर्ते सैरभैर होऊ नयेत आणि निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.




















