
जळगाव मिरर | २२ नोव्हेंबर २०२३
जामनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलाला विजेचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज दि.२२ रोजी बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पहूर येथील शिवनगर परिसरात राहणाऱ्या दीपक सुरेश वारुळे (वय १६) हा तरुण दि.२२ रोजी बुधवारी प्लग आणि वायरची जोडणी करत असताना त्यास विजेचा जबर धक्का बसल्याने त्याची शुद्ध हरपली. यावेळी घरा शेजारील काही नागरिकांनी त्यास तातडीने उपचारार्थ पहूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. पहूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. नजमुद्दीन तडवी, डॉ. रुपाली पाटील, परिचारिका योगिता नागरे, वैशाली पाटील यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर त्याला उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात विधवा आई व विवाहित बहीण आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.