
जळगाव मिरर | ३ मार्च २०२६
कोविड-१९ महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा बजाविलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी न्याय मिळावा, अशी मागणी जनसेवा विचारधारा फाऊंडेशन यांनी २ मार्च २०२६ रोजी आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे निवेदन देऊन केली. यावेळी आमदारांनी अधिवेशनात या कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
कोविड-१९च्या महामारीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी रक्ताचे नातेवाईक देखील घाबरत असताना, कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून राज्यभर सेवा बजावली. वेडबॉय, बेड सहाय्यक, डॉक्टर, नर्सेस, ॲम्ब्युलन्स चालक, आया, डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अतुलनीय योगदान दिले, ज्याबद्दल केंद्र व राज्य शासनाने आधी गौरव व सन्मानही केला होता.
महामारी शांत झाल्यानंतर अनेक कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनसेवा विचारधारा फाऊंडेशनच्या निवेदनात अधिवेशनात कंत्राटी कर्मचाऱ्यांना विविध विभागात पुन्हा कंत्राटी स्वरूपात सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, जिल्हा परिषद, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर सरकारी तसेच निमशासकीय कार्यालयातील मानवी संसाधनाची कमतरता देखील भागवता येईल, असे नमूद करण्यात आले.
मा.आ. राजूमामा भोळे यांनी निवेदन स्वीकारत कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. तसेच या विषयावर सकारात्मक चर्चा करून योग्य ती कारवाई होईल, अशी माहिती निवेदनकर्त्यांना दिली. निवेदन देताना निलेश बोरा, रमेश वानखेडे, प्रेम वानखेडे, बबन सावळे, विनोद सपकाळे, युवराज सुरवाडे, कृष्णा सावळे, हेमंत बिऱ्हाडे उपस्थित होते. हा प्रयत्न कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी न्याय मिळविण्यासाठी महत्त्वाचा पाऊल मानला जात आहे.




















