जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२३
राज्यातील ठाकरे व शिंदे गटातील नेत्यामध्ये सुरु असलेल्या आरोपाच्या फैरी कुठेही थांबायचे नाव घेत नाही आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीकेला उत्तर दिले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली होती. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून मनमानी चालणार नाही. शिवसेना शिंदेंच्या वडिलांनी स्थापना केली होती का? शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंची प्रमुखपदी निवड झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे. हा फूटलेला गट नाही. तो फुटलेला गट आहे, असे राऊत म्हणाले होते.
सत्ता आहे म्हणून तुम्ही काहीही कराल असे अजिबात चालणार नाही. गतवर्षी शिवाजी पार्कवर आमचा दसरा मेळावा झाला. यावेळीही आमचाच दसरा मेळावा तिथेच होईल, असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. संजय राऊत यांच्या या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली नाही. पण, ती संजय राऊतांच्या वडिलांनी म्हणजे राजाराम राऊत यांनी स्थापन केली का? असे ते म्हणाले.