जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२४
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये जागावाटपावरून काही मतभेद सुरू आहेत. दिल्ली येथे महायुतीची जागावाटपाची चर्चा सुरू असून यात गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून वक्तव्य केले आहे. ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप घ्यावे लागणार असल्याचे दिसते.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले, शिंदे जी, या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदे महत्त्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदे फक्त व्यवस्था आहे. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला. त्यामुळे जागावाटपात मित्रपक्षांना झुकते माप द्या, असे अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात गृहमंत्री अमित शहा जातीने लक्ष देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुख्यमंत्रीपद हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे म्हणजे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे मित्रपक्षांना त्यांनी जास्तीत जास्त जागा द्याव्यात, असा आग्रह भाजपकडून केला जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपसमोर झुकते माप घ्यावे लागणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देखील चांगल्या जागा मिळाव्यात यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात प्रयत्न सुरू असल्याचे समजत आहे. तसेच अजित पवारांचा पक्ष महायुतीकडून लढणार आहे त्यामुळे अजित पवारांना सत्तेत सामील होताना भाजपने जो शब्द दिला होता तो शब्द पाळणार असल्याची माहिती आहे.