जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील अपघाताच्या निमित्ताने चर्चेत आली होती. आता नृत्यांगणा गौतमी पाटील हिने अखेर अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे. या अपघातानंतर गौतमी पाटीलवर मदतीसाठी संपर्क न साधल्याबद्दल गंभीर आरोप झाले होते. मात्र, भेट झाल्यानंतर रिक्षाचालकाच्या मुलीने गौतमी पाटीलचे जाहीर आभार मानले असून, वाद संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
30 सप्टेंबर रोजी पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने एका रिक्षाला जबर धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये नव्हती, तरीही कार तिच्या नावावर असल्याने पोलिसांनी तिला नोटीस बजावली होती.
अपघातानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन गौतमी पाटीलने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही किंवा कोणतीही मदत केली नाही, असे आरोप केले होते. एवढेच नाही तर, त्यांनी गौतमी पाटीलला अटक करून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही तातडीने कारवाईच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्यामुळे गौतमी पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या आरोपांवर गौतमी पाटीलने आपली बाजू स्पष्ट केली होती. अपघातानंतर माझा मानलेला भाऊ त्या कुटुंबाला भेटायला गेला होता आणि त्याने मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, कुटुंबीयांनी ‘आम्ही कायद्यानुसार जाऊ’ असे सांगून मदत नाकारली, असे ती म्हणाली होती. यानंतर कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली बदनामी केल्याने आपणही कायद्यानुसारच उत्तर देणार असल्याचे गौतमीने म्हटले होते. मात्र, आता गौतमीने रिक्षाचालक विठ्ठल मरगळे यांची मुलगी आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या भेटीनंतर रिक्षाचालकाच्या मुलीने गौतमी पाटीलचे आभार मानले असून, त्यांच्यातील गैरसमज दूर झाल्याचे दिसून आले. या समेटाने अपघातानंतर सुरू झालेल्या वादावर आणि आरोपांवर पडदा पडला आहे.