जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरात नुकतेच दोन दिवसापूर्वी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या नीलकमल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांना मारहाण करणाऱ्या शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिल्पा राठोड यांना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. तसे आदेश सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी काढण्यात आले असून राठोड यांची विभागीय चौकशीदेखील होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी नीलकमल हॉस्पिटलमध्ये डॉ. नीरज चौधरी हे शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह कारने आले होते. त्या ठिकाणी कार लावण्यावरून वाद झाला व दोन नारळ विक्रेत्यांनी डॉक्टरची कॉलर पकडून व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोयता उगारला होता. त्यानंतर त्या ठिकाणी शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचारी शिल्पा राठोड या तेथे आल्या व त्यांनी डॉ. नीरज चौधरी यांना मारहाण केली होती.
या प्रकरणी डॉ. नीरज चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस कर्मचारी शिल्पा राठोड यांना तडकाफडकी निलंबित केले. तसे आदेश काढण्यात आले असून राठोड यांच्या विभागीय चौकशीचेही आदेश दिले आहे.