जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२५
विधानसभेत आज अनपेक्षित प्रसंग घडला. ‘माझी लाडकी बहीण’ योजना प्रत्येक विषयाशी जोडणाऱ्या स्वतःच्या पक्षातील एका आमदारावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावे लागेल,” अशा कठोर शब्दांत त्यांनी आमदारांना सुनावले.
घटना अशी की, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “मी मागील सरकारमध्ये एक आणि आता एक — अशा दोन लक्षवेधी सूचना केल्या. आपल्या (मुख्यमंत्र्यांच्या) दालनात तीन बैठका झाल्या. पण कारवाई होत नाही. ग्रामीण भागातील आमदारांना रोजचा हा त्रास आहे. लाडक्या बहिणींचे दुःख हेच की अवैध दारूवर आळा घालावा.”
या वक्तव्यातून अभिमन्यू पवार यांनी अप्रत्यक्षपणे गृह खात्याकडे (फडणवीस यांच्या नेतृत्वातील विभागाकडे) बोट दाखवले. त्यांनी पुढे कायद्यात दुरुस्तीची गरज असल्याचे सांगितले आणि विधानसभा अध्यक्षांनीही निर्देश दिल्याचे नमूद केले. “निर्देश दिल्यानंतरही कारवाई होत नसेल, तर ही चिंता आहे,” असे पवार म्हणाले.
अभिमन्यू पवार यांच्या या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस संतापले. त्यांनी ठाम शब्दांत सांगितले,
“प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावे लागेल. प्रत्येक गोष्टीत ‘लाडकी बहीण’ म्हणणे योग्य नाही. या योजनेचे पैसे सुरूच राहतील. ही योजना इतर कोणत्याही योजनेशी तुलना करता येत नाही.”
यापूर्वीही काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावर चर्चा करताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख केला होता. “लाडक्या बहिणींना 1500 रुपये नको, सुरक्षा द्या,” असा त्यांचा सूर होता. त्यावरही फडणवीसांनी योजनेचा अनावश्यक उल्लेख टाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्या काही मिनिटांतच भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पुन्हा ‘लाडकी बहीण’ योजनेचा संदर्भ दिल्याने मुख्यमंत्र्यांचा पारा चढला आणि सभागृहात हा नाट्यमय प्रसंग घडला.




















