परभणी : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे. मनोज जरांगे हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आणि टीका करत आहेत. त्यातच रविवारी ते परभणी दौऱ्यावर होते. यावेळीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. फडवणीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका, तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय, तुमचा सुपडासाफ होईल असे जरांगे यांनी म्हंटले आहे.
परभणीच्या मानवत शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानात रविवारी मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकल मराठा समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव बैठकीला उपस्थित होते. दरम्यान याचवेळी बोलतांना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.
पुढे बोलतांना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ”नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी मारली, तिच्यात तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही का? असा सवाल जरांगेंनी फडणवीसांना विचारला. महत्वाचे म्हणजे फडवणीस मला संपवणार आहेत. त्यांना देव मानणाऱ्या एकाने मला ही बाब सांगितली आहे”, असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे पालकत्व स्वीकारलेले आहे. त्यांनी तुरुंगात टाकण्याचा डाव आखला आहे. मात्र त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही” असेही जरांगे म्हणाले.