जळगाव मिरर | १८ मे २०२३
देशातील अनेक महिलासह पुरुषांना सोने खरेदीची खूप आवड असते पण सध्याचे सोन्याचे दर वाचून अनेकांना धक्काच येत आहे. तरी देखील अनेक लोक सोने खरेदी करीत असतात. लोकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याचा पर्याय देणारी मोदी सरकारची सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम सुपरहिट ठरत आहे. याद्वारे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगली कमाई होतेय.
SGV Schemeमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा पैसा अवघ्या पाच वर्षांमध्ये दुप्पट झाला आहे. स्वस्तात सोनं खरेदी करण्यासाठी ही योजना प्रसिद्ध आहे. ही योजना सरकारने 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये मॅच्योरिटी पीडियर आठ वर्षांचा आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम, खरंतर, बाजारभावापेक्षा स्वस्त सोने खरेदी करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. जो सरकारकडून उपलब्ध केला जातो. या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गोल्ड बॉन्ड जारी करते. त्याची खरेदी म्युच्युअल फंडासारख्या युनिट्समध्ये करण्यात येते. रिझर्व्ह बँक वेळोवेळी अटी व शर्तींसह गोल्ड बॉन्ड जारी करत असते. या गोल्ड बॉन्डची सरकारी गॅरंटी असते. महत्त्वाचं म्हणजे, ज्यावेळी तुम्ही ते विकण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला विक्रीवर सोनं नाही तर त्यावेळच्या मूल्याच्या आधारावर पैसे मिळतात.
2018 पासून वाढली किंमत
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमचा मॅच्योरिटी पीडियर आठ वर्षांचा असला, तरी पाच वर्षांनी पैसे काढता येऊ शकतात. गेल्या पाच वर्षात 2017-18 या आर्थिक वर्षातील मे महिन्यातील सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या पहिल्या टप्प्यातील पैसे काढण्याआधीचा कालावधी 12 मे 2023 रोजी पूर्ण झाला आहे. या टप्प्यात, ज्या गुंतवणूकदारांनी सोने खरेदी केले होते, त्यांच्यासाठी प्रति ग्रॅम गोल्ड बाँडची किंमत 2,901 रुपये निश्चित करण्यात आली होती, तर सध्या त्याची किंमत 6,115 रुपये झाली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांची गुंतवणूक दुपटीने वाढली आहे.
या गोल्ड बॉन्ड स्किम अंतर्गत पाच वर्षांत मिळालेल्या रिटर्नविषयी बोलायचं झालं तर गुंतवणूकदारांना 110 टक्के रिटर्न मिळाला आहे. सरकारची ही स्किम गुंतवणूकदारांना चांगलीच पसंत पडतेय. नफा पाहता त्यात गुंतवलेली रक्कम काढण्याचे आकडे माफक आहेत. सरकारने आतापर्यंत एकूण 62 वेळा सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी केले आहेत आणि त्यापैकी 21 चा पैसे काढण्यापूर्वीचा कालावधी पूर्ण झालाय. परंतु पैसे काढण्याऐवजी, गुंतवणूकदार अधिक फायदा होण्याच्या दृष्टीने ते पैसे तसेच ठेवताय. सॉवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करण्यासाठी कॅश, डिमांड ड्राफ्ट किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. यामध्ये फिजिकल सोने खरेदी करण्याऐवजी डिजिटल सोने खरेदी करण्याची सुविधा आहे.