
जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२६
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गावर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवाजीनगर उड्डाणपुलावरून टॉवर चौकात येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच मार्गावरील सात चौकांमध्ये मिरवणुकीदरम्यान बॅरेकेटिंग करुन हे उपरस्ते बंद केले जाणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातील विविध भागातून मिरवणुक काढली जाते. त्यानंतर त्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाच्यावतीने आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये मिरवणूक दरम्यान वाहतुकीचा अडथळा होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. १४ एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून गोविंदा रिक्षा थांबा, चित्रा चौक, खैरनार ऑप्टीकलनजीक, घाणेकर चौक, सानेगुरुजी चौक, महापालिका इमारतीच्या बाजूला गोलाणी मार्केटकडून येणारा रस्ता, टॉवर चौकात चित्रा चौकाकडे जाणारा रस्ता या ठिकाणी बॅरिकेटस लावण्यात येऊन हे उपरस्ते बंद करण्यात येणार आहेत.
मिरवणुक मार्गावरील या उपरस्त्यांवर गर्दी वाढल्यास वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. मिरवणूक काळात या मार्गावर कोणीही, कोणतेही वाहन आणू नये, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.
शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलावरून टॉवर चौकात येणारा रस्ता दि. १४ रोजी संध्याकाळपासून बंद राहणार आहे. शिवाजीनगरकडून येणारी वाहतूक दूध फेडरेशन व अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. जेणेकरुन मिरवणुक मार्गावर अन्य वाहनांमुळे अडथळा निर्माण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी, वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन देसले व सहकाऱ्यांनी मिरवणुक मार्गाची पाहणी केली.




















