जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२५
अती पावसामुळे कपाशीच्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे दिवसेंदिवस कर्जाचा बोझा वाढत होता. त्यामुळे काही दिवसांपासून तणावात असलेल्या राजू शंकर तळेकर (वय ५५, रा. देव्हारी, ता. जळगाव) या शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील देव्हावी येथे राहणारे राजू तळेकर यांची गाव शिवारात शेती असून त्यांनी शेतात कपाशी लागवड केली आहे. परंतु यंदा अतिपावसामुळे पिकांवर परिणाम होत असून अगोदरच विकास सोसायटी व खासगी असे सात आठ लाख रुपयांचे त्यांच्यावर कर्ज आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात होते. याच तणावातून त्यांनी दि. ५ रोजी शेतात विषारी औषध प्राशन केल्याची माहिती त्यांचा मुलगा अनिल तळेकर यांनी दिली. हा प्रकार आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच तळेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.