जळगाव मिरर | २० जानेवारी २०२६
पिंप्राळा परिसरातील बारीवाड्यातील एका घरावर डीवायएसपी यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास छापा टाकून देहविक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत पश्चिम बंगालच्या २८ वर्षीय तरुणीसह चार महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना आशादीप शासकीय वसतिगृहात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, छाप्याच्या वेळी एक ग्राहक पळून जाण्यात यशस्वी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती डीवायएसपी नितीन गणापुरे यांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार, बारीवाडालगत एका महिलेच्या घरात पोलिसांनी १५०० रुपये देऊन एका पंटरला ग्राहक म्हणून पाठवले. खात्री झाल्यानंतर पंटरने मोबाईलवर मिस कॉल देताच पोलिस पथकाने घरावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान देहविक्रीचा व्यवसाय चालवणारी महिला व चार महिला आढळून आल्या. घराला असलेल्या तीन दरवाजांचा फायदा घेत एक ग्राहक पळून गेला. पोलिसांनी या ठिकाणाहून पश्चिम बंगालची २८ वर्षीय तरुणी, सुरत येथील ३० वर्षीय महिला तसेच जळगावातील ३५ वर्षीय दोन महिलांची सुटका केली.
सदर घर एका समाजाच्या पंचमंडळाच्या जागेजवळ असून, इतर घरांपासून काहीसे वेगळे व दोन बाजूंनी रस्ते असल्याने येथे देहविक्रीचा अड्डा सुरू होता. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. मात्र, संबंधित कुटुंब गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने थेट विरोध करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. तरीही अनेक नागरिकांनी पोलिसांकडे दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करीत आहेत.




















