
जळगाव मिरर | ९ मार्च २०२६
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे ते पुन्हा विधान परिषदेत येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्क-वितर्क सुरु आहे.
ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी या मुद्यावर ठाकरे यांच्यावर टीका करत उपरोधिक सल्ला दिला आहे.
म्हस्के म्हणाले, “दिल्लीसमोर नाराजी व्यक्त करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा. शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत आणि जर त्यांना फोन केला तर ते तुमच्या पाठीशी उभे राहतील.” त्यांनी असेही म्हटले की, दिल्लीकडे धाव घेण्यापेक्षा शिंदेंशी संवाद साधावा, असे ठोकपणे सल्ला दिला. त्यांनी राज्यसभा निवडणुकीचा संदर्भही दिला आणि म्हटले की, ठाकरे गटाकडून राज्यसभा उमेदवार न देण्यामागे पक्षातील काही आमदार फुटण्याची भीती होती. “जर उमेदवार दिला असता, तो निवडून आला नसता,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानमंडळाचे अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त आहेत, आणि त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ सध्या थंड असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले. मात्र, “पुढे काय घडेल हे पाहावे लागेल,” असे इशारा देऊन त्यांनी भविष्यातील राजकीय हालचालींचा संकेत दिला.
उद्धव ठाकरेंचे पुढील राजकीय भविष्य
मे मध्ये विधान परिषदेच्या एकूण नऊ जागा रिक्त होणार आहेत. सध्याच्या विधानसभा संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीला केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गट त्या एकमेव जागेसाठी आग्रही असून उद्धव ठाकरे यांना ही जागा मिळावी, अशी भूमिका घेत आहे. मात्र, या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहील, हे देखील मोठ्या प्रमाणावर ठरवणार आहे.
मतविभाजन टाळण्यासाठी आघाडीत कोणती तडजोड होते आणि कोणता निर्णय घेतला जातो, यावर उद्धव ठाकरे यांचे पुढील राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे. आगामी काही महिन्यांत राज्यातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.




















