
जळगाव मिरर | २३ मार्च २०२६
शहरातील दांडेकर नगर परिसरात राहणारे मुकेश दिलवर वाल्मिकी (वय ६२) यांचा जिन्यावरून पाय घसरून पडल्याने झालेल्या दुखापतीमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश वाल्मिकी हे दूध फेडरेशनजवळील दांडेकर नगर येथे वास्तव्यास होते. दि. १९ फेब्रुवारी रोजी ते आपल्या राहत्या घरातील जिन्यावरून उतरत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दि. २६ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना दि. १ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. तसेच ही नोंद झिरो क्रमांकाने वर्ग करण्यात आली आहे.




















