
जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२६
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात शेअर मार्केटमधील कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका तरुणाने ७३ वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, मृत महिला ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला घरात राहण्यास जागा दिली, त्याच भाडेकरूने पैशांच्या हव्यासापोटी त्यांचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.
मृत महिलेचे नाव गंगुबाई कालिदास गडदे (वय ७३) असे असून त्या बार्शीत एकट्याच राहत होत्या. घरभाड्याच्या उत्पन्नावर त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या. २५ मार्च २०२६ रोजी त्या घराला कुलूप लावून बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र काहीच माहिती न मिळाल्याने २७ मार्च रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गंगुबाई या चांगदेव गोवर्धन पाटील याच्यासोबत एका इमारतीत जाताना दिसून आल्या. मात्र त्या पुन्हा बाहेर आल्याचे आढळले नाही. शिवाय संशय टाळण्यासाठी काही सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
बार्शी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. २ एप्रिल रोजी आरोपी चांगदेव पाटील याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसी चौकशीत अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात उघड झाले की, शेअर मार्केटमधील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे आरोपी कर्जबाजारी झाला होता. या कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने गंगुबाईंच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी हा कट रचला. २५ मार्च रोजी त्याने गंगुबाई यांना आपल्या घरी बोलावून लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध झाल्यानंतर टॉवेलने नाक-तोंड दाबून त्यांची हत्या केली.
यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह काळ्या पिशवीत भरून स्वतःच्या हुंदाई वेरना (MH-20 CS 8937) कारमधून नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, आरोपी गेल्या पाच वर्षांपासून गंगुबाईंच्या घरात भाड्याने राहत होता. त्यांच्यात कौटुंबिक संबंधांसारखे जिव्हाळ्याचे नाते होते. मात्र पैशांच्या हव्यासापोटी या विश्वासाचा घात करत त्याने हा अमानुष कृत्य केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी शशिकांत किसन वायकुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






















