जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२५
जळगाव जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी सागर चित्रे यांनी विजयी होत बाजी मारली. तसेच सचिवपदी अॅड. विरेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी अॅड. स्मिता झाल्टे तर सहसचिव अॅड. लिना म्हस्के हे उमेदवार विजयी झाले. रात्री उशिरा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी एकच जल्लोष केला.
जिल्हा वकील संघांच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ३६ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी तीन अर्ज छाननीवेळी नामंजूर झाल्याने व दोन महिला उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने १३ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात होते. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष यांच्या प्रत्येकी एक व पुरुष सदस्यांच्या आठ अशा एकूण १३ जागांसाठी मंगळवारी दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. यामध्ये एकूण एक हजार १० मतदारांपैकी ८८१ जणांनी (८७.२२ टक्के) मतदान केले. त्यानंतर दुपारी साडेचार वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. रात्री सव्या अकरा वाजेच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
अध्यक्षपदी अॅड. सागर चित्रे यांनी ४५४ मते मिळवून बाजी मारली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय राणे यांचा १०१ मतांनी त्यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदी अॅड. स्मिता झाल्टे, सचिवपदी अॅड. विरेंद्र पाटील, सहसचिवपदी अॅड. लिना म्हस्के तर कोषाध्यक्षपदी अॅड. प्रवीण चित्ते हे उमेदवार रात्री उशिरा विजयी घोषीत करण्यात आले तसेच रात्री उशिरापर्यंत आठ सदस्य पदांच्या उमेदवारांची मतमोजणी सुरु होती. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. पुष्पहार घालून व पेढे भरवून विजेयी उमेदवारांचे कौतुक करण्यात आले.
