
जळगाव मिरर | २३ मार्च २०२६
भडगाव शहरातील जुन्या पारोळा रस्त्यावर पोलिसांनी कारवाई करत एका कारमधून एमडी (अमली पदार्थ) जप्त केला असून, या प्रकरणी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. भडगाव तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे अमली पदार्थाची तस्करी उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथून भडगावच्या दिशेने एका कारमधून (क्र. एमएच ०१ बीबी २२१६) अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भडगाव पोलिसांनी जुन्या पारोळा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला.
दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास संशयास्पद कार अडवून तिची तपासणी करण्यात आली. यावेळी कारमध्ये १० पुड्या एमडी ड्रग्स आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ कारसह आरोपी योगेश हरी चौधरी आणि सरगम हरी चौधरी (रा. पारोळा, सध्या मुक्काम भडगाव) यांना ताब्यात घेतले.
जप्त केलेल्या अमली पदार्थांची खातरजमा करण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, भडगाव तालुक्यात प्रथमच एमडीसारख्या घातक अमली पदार्थाची तस्करी समोर आल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणामागे आणखी कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.




















