जळगाव मिरर । १९ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून वाळूमाफीयांनी मोठा हैदोस घातला होता. यावर नियमित जिल्हा प्रशासनाकडून बैठका सुरू होत्या मायक्रो प्लॅन सुद्धा बनवण्यात येत होते पण रस्त्यावर कारवाई होत असताना दिसत नव्हती नुकतेच नवनियुक्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच झालेल्या पत्रकार परिषदेत वाळू माफियांना जणू तंबीच दिली होती या तंबीच दिल्यानंतर आज पहाटे पोलीस पथकाने थेट गिरणा नदी पात्रा जवळच्या गावात जाऊन डंपर, ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे यामुळे वाळु माफियात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरा नजीक असलेल्या गिरणा नदी पात्रा जवळील आजूबाजूच्या गावात मध्यरात्री व भर दिवसा अवैध वाळू माफिया डंपर व ट्रॅक्टरच्या माध्यमातून गिरणा नदी पात्रातून वाळूचा मोठा उपसा करीत होते. यावर नियमित पोलीस प्रशासनास महसूल प्रशासनाकडून कारवाई देखील होत होती पण वाळूमाफिया कुठल्याही पद्धतीत थांबण्याचे नाव घेत नसल्याने नवनियुक्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मायक्रो प्लान आखत वाळू माफियांची मोठी तारांबळ उडवली आहे. आज गिरणा नदी परिसरात असलेल्या गावात उपविभागीय अधिकारी संदीप गावित व आप्पासाहेब पवार यांच्या पथकाने अनेक डंपर सह ट्रॅक्टर तपासणी करून यांच्यावर कारवाई करीत असल्याचे खात्रीजनक वृत्त आहे. या कारवाईमध्ये 50 ते 60 डंपर सह ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते.
यांनी केली कारवाई
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, आप्पासाहेब पवार, तहसीलदार नामदेव पाटील धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्यासह तलाठी मंडळाधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.