जळगाव मिरर | ७ जुलै २०२३
राज्यातील भाजप व शिंदेंच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादीचे अजित पवार सत्तेत गेल्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यासह ते या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यामुळे राजकारणात खळबळ उडवणाऱ्या गोष्टी घडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पुन्हा एकदा राज ठाकरे हे आज आले आहेत. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होत आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याचं बोललं जात आहे. पण या भेटीचे अनेक राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर राज्यातील राजकारण आता अधिकच अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे. कारण यामागे काही नव्या राजकीय समिकरणांवर देखील चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाच राज ठाकरे यांनी वैचारिक भूमिकेचा दाखला देत स्वागत केलं होतं. तेव्हापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. त्यांच्यातील संबंध चांगले राहिले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकांसाठी देखील राज्यातील पक्षांनी तयारी सुरु केल्या आहेत. त्यादृष्टीनं राज्यात काही नवी राजकीय समिकरणंही मांडली जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीकडं पाहिलं जात आहे.