जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा कार्यक्रमांतर्गत चारसदस्यीय बाह्यमूल्यांकन पथकाने तरसोद जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची तपासकेली. शाळेत झालेल्या निरीक्षणादरम्यान अनेक सकारात्मक बाबी प्रकर्षाने दिसून आल्या.
शिक्षण विस्तार अधिकारी शांताराम कुंभार, स्काफ राज्य मार्गदर्शन समिती सदस्य डॉ. जगदीश पाटील, प्रा. हेमंत पिंपळे, सुचिता पांढरकर या पथकाने शाळेला भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मिलींद कोल्हे, उज्ज्वला कुलकर्णी, सुनंदा जावळे, सुषमा पाटील, जगदीश जाधव, जयश्री महाजन उपस्थित होते. प्रारंभीच्या वर्गात संख्याज्ञान आणि भाषिक कौशल्यात विद्यार्थ्यांची चांगली तयारी जाणवली. सर्वच वर्गाची आकर्षक व शिक्षणाभिमुख सजावट, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, वाचनातील गती आणि प्रश्नोत्तरांमधील सक्रियता विशेष जाणवली. विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी अडचणी येतात, त्या ठिकाणी शिक्षक प्रेमाने मार्गदर्शन करत असल्याचेही पथकाच्या निदर्शनास मानले. सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी तर आभार मुख्याध्यापक मिलिंद कोल्हे यांनी मानले.
शाळेतील प्रत्येक वर्गात टीव्ही व प्रोजेक्टरची सुविधा उपलब्ध असल्याने डिजिटल शिक्षण प्रभावीपणे राबवले जात आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून अध्यापन अधिक रोचक व समजण्यास सोपे करण्याचा शाळेचा प्रयत्न प्रशंसनीय जाणवला. तरसोद शाळेचे स्वतःचे युट्युब चॅनल असल्याने शालेय उपक्रमांचे व्हिडिओ नियमितपणे अपलोड केले जातात. यामुळे पालक व समाजापर्यंत शाळेचे उत्तम कार्य पोहोचत असून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्यही कौतुकास्पद असल्याचे मूल्यांकन पथक प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी शांताराम कुंभार यांनी अधोरेखित केले.
तरसोद जिल्हा परिषद शाळा ही मुलांच्या संख्याज्ञान, भाषिक विकास, डिजिटल शिक्षण आणि सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत उत्तम पद्धतीने कार्यरत आहे. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व नियमित उपक्रमशीलता इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे स्काफ निर्मिती तज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले




















