जळगाव मिरर | ९ जून २०२३
बनावट फेसबुक खाते उघडून पैशांची मागणी होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, सायबर चोरांनी चक्क अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या नावाने दोन वेळा बनावट खाते उघडून पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात सायबर ठगाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्यांदा २८ मार्च रोजी ठगाने अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून त्याद्वारे इतरांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविल्या होत्या. त्यातील ज्यांनी या रिक्वेस्ट स्वीकारल्या त्यांना पैशांची मागणी झाल्याने, त्यांनी याबाबत अपर पोलिस अधीक्षकांना माहिती दिली होती. गवळी यांनी पोलिस कर्मचारी अजय पाटील यांना बनावट खाते बंद करण्याच्या सूचना केल्यानंतर सायबर पोलिसात अर्ज देऊन संबंधित खाते बंद झाले होते.
हा प्रकार इथेच न थांबता सायबर ठगांनी पुन्हा गवळी यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्याद्वारे पुन्हा पैशांची मागणीचे संदेश इतरांना पाठविले. हा प्रकार चंद्रकांत गवळी यांना कळताच, त्यांनी अजय पाटील यांना तक्रार देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बुधवारी अजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अपर पोलिस अधीक्षकांच्या नावाने बनावट खाते बनवून पैशांची मागणी करीत बदनामी केली म्हणून सायबर ठगाविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.