बोदवड : प्रतिनिधी
ओळख असल्याची बतावणी करुन घरात चोरी करणाऱ्या दोन भामट्याला बोदवड पोलिसांनी अटक केली आहे. राजू दिपा कोळी (रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर) असे संशयित आरोपीची नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील राजूर गावातील शांताराम बिजारने यांची मुलगी काजल सिया २९ ऑगस्ट २२ रोजी दुपारच्या वेळेला घरात एकट्या होत्या. त्यावेळी एक अनोळखी पुरुष व महिला यांनी घरी आल्यावर त्यांना सांगितले की, मी बोदवडचा एकनाथ महाराज आहे. बोदवड येथील गजानन महाराज मंदिरावर माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. आमची गॅसची हंडी संपल्याने तुमच्या वडीलांनी मला तुमच्याकडे पाठविले असून घरून गॅस हंडी घेण्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी शांताराम बिजारने यांना फोन लावल्यासारखे भासवले. त्यानंतर घरातील गॅसची हंडी घेतली व त्याच्या सोबत असलेल्या महिलेने घरात टि.व्ही जवळ ठेवलेला मोबाईल व सोन्याचे मनी असलेली पोत लंपास केले होते. या बाबत बोदवड पोलीस स्टेशनला दिनांक 30/08/2022 रोजी फिर्यादी काजल सिया (रा. राजुर ता.बोदवड) यांनी दिलेल्या तक्रारी वरुन भा.दं.वि. कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचा तपास चालू असतांना पोलीस निरीक्षक, राजेंद्र गुंजाळ, बोदवड पोलीस स्टेशन यांनी अशाच प्रकारच्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांबाबत माहीती काढली. तसेच त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन राजू दिपा कोळी (रा. चारठाणा ता. मुक्ताईनगर) यास ताब्यात घेत विचारपुस केली. पोलीस चौकशीत त्याने करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोबाईल, गॅसची हंडी व गुन्हा करते वेळी वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून त्याच्या सोबत गुन्ह्यात सहभागी फरार महिलेचा शोध पोलीस घेत आहेत. या दोघांनी आणखी असे काही गुन्हे केले असल्यास ते सुद्धा उघडकीस येऊ शकतात. त्या दृष्टीने सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे. पुढील तपास पो.हे.कॉ वसंत निकम हे करीत आहे. ही कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक, डॉ. प्रविण मुंढे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, राजेंद्र गुंजाळ, पो.हे.कॉ.वसंत निकम, पो.कॉ.मुकेश पाटील, पो.कॉ. भगवान पाटील, पो.कॉ. निलेश सिसोदे यांनी केली.