जळगाव मिरर | १५ मार्च २०२५
राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होत असतांना आता पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर भागातील म्हातोबाची आळंदी गावात एका शेतात अफुची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली.
याप्रकरणी मंगल दादासाहेब जावळकर (वय ४५, रा. म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर, ता. हवेली) या महिलेला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर म्हातोबाची आळंदी गाव आहे. जगताप मळा रस्त्यावर मंगल जावळकर हिची जागा आहे. या जागेत अफुची लागवड करण्यात आली होती. तेथे अफुची ६६ झाडे लावण्यात आल्याची माहिती खबऱ्याने लोणी काळभोर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पंचासमक्ष तेथे छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत तेथे अफुची ६६ झाडे लावण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर जमीन मालक जावळकर हिला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक अनिल जाधव, हवालदार क्षीरसागर, वणवे, कटके, कुदळे, नानापुरे, तेलंगे यांनी ही कारवाई केली.




















