अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील मारवड गावात शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा शेतकऱ्यांनी आडवाला. त्यांच्यावर प्रश्नांची सुरुवात झाली खरे पण अपेक्षित उत्तरे नसल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्रीच नव्हे तर पालकमंत्री हि आहेत, याचे भान विसरले. त्यांना संयम राखता येत नसेल आणि दंडच थोपटून कुस्त्या खेळायच्या असतील तर त्यांनी राजीनामा देऊन राजकारण सोडून द्यावे, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांमधून उमटू लागल्या आहेत.
अमळनेर तलुक्यातील निम येथील कपिलेश्वर मंदिराच्या सभागृह आणि पांझरा नदीवरील पादचारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सोबतच मारवड मार्गे कपिलेश्वर मंदिरावर जात असताना मारवड गावात शेतकरी नेते शिवाजीराव पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अडवला.
यावेळी अमळनेर तालुक्यात अनेक दिवस पावसाचा खंड होता, पुरेसा पाऊस पडला नाही तरी अद्याप तालुका दुष्काळी का जाहीर होत नाही, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तीन महिने उलटले तरी मिळत नाही अशा मागणीचे निवेदन दोघा मंत्र्यांना दिले. त्यावेळी कायदेशीर बाबी मंत्री अनिल पाटील गुलाबरावाना समजावून सांगत असताना मध्येच एकाने हे काहीच करणार नाही रे’ असे उपरोधात्मक वक्तव्य केल्याने पालकमंत्री गुलाबराव चिडले. त्यावर शिवाजी पाटील यांनी तुम्ही मंत्री आहात भडकू नका म्हणून सांगितल्यावर दोघांमध्ये खडाजंगी झाली. शाब्दिक चकमक जोरात होऊ लागताच मंत्री अनिल पाटील यांनी देखील संताप व्यक्त केला. यावेळी काही नागरिकानी व्हिडीओ चित्रिकरण देखील केले. पोलिसांनी अधिक वाद होऊ नये म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवाजी पाटील यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला बसवून ठेवले व मंत्र्यांचा ताफा कपिलेश्वर कडे रवाना झाला.