जळगाव मिरर । संदीप महाले
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर गंभीर संकट कोसळले आहे. शेतजमिनी, पिके आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आणि सामान्य नागरिक उघड्यावर आले आहेत. या कठीण प्रसंगी मदतीसाठी सरकारकडून उपाययोजना होत असतानाच, महायुती सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी पुढाकार घेत आपल्या एक वर्षाचे संपूर्ण वेतन ₹३१,१८,२८६ मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहे.
मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान, महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृतरित्या धनादेश सुपूर्द केला. याआधी सोमवारी, जामनेर येथे झालेल्या व्यापारी संमेलनात, त्यांनी या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. दरम्यान, या मदतीव्यतिरिक्त तालुका पोलिसपाटील संघटनेकडून ₹५१,००० इतकी मदत देखील मुख्यमंत्री निधीसाठी दिल्याचे समजते. मात्र, महाराष्ट्रात एकूण २८८ आमदार असतानाही, केवळ गिरीश महाजन हे एकमेव आमदार अशी उचल घेत पुढे आले आहेत, हे लक्षवेधी आहे. राज्यभरात शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असताना, इतर लोकप्रतिनिधी मात्र मदतीसाठी पुढे न आल्याची खंत जनतेतून व्यक्त केली जात आहे.
गिरीश महाजन यांच्या कृतीने सामाजिक भानाचे उदाहरण दिले असले तरी, इतर २८७ आमदारांनी अजूनही कोणतीही मदत जाहीर न केल्याने प्रश्न उपस्थित होतो . लोकप्रतिनिधींनी संकटसमयी फक्त भाषणं द्यायची की प्रत्यक्ष कृती करायची? शेतकऱ्यांचे पीकच नव्हे तर संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकजण मंदिरांमध्ये आसरा घेत जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर, लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावे आणि शेतकऱ्यांसाठी ठोस मदत करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.




















