जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या मालिका सुरु असतांना खान्देशात देखील एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील बाभळे फाटा येथे मालवाहू वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत पंधरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. या अपघातात वीस ते पंचवीस मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून मध्यप्रदेशकडे जात असताना मालवाहू वाहनाचा शिरपूर तालुक्यातील बाभळे फाटा येथे अपघात झाला. या वाहनातील सर्व प्रवासी हे मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे पंचवीस मजूर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे. यामधील सहा ते सात मजूरांची प्रकृती गंभीर बनली आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.
